Thursday, July 30, 2020

वर्तमानातील असंतोषाचे जनक

 
वर्तमानातील असंतोषाचे जनक
• प्रसाद द. पोफळी, नागपूर

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील असंतोषाचे जनक म्हटलं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे समीकरण प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यात अगदी फिट्ट बसलेलं !! अगदी इतिहासाला आपला कट्टर शत्रू समजणारा विद्यार्थी सुद्धा प्रश्नपत्रिकेतील जोड्या लावा पैकी ही एक जोडी अगदी बरोब्बर लावायचा. 

असंतोष ...!! असंतोष म्हणजे नेमकं काय बरं ?? संतोष किंवा समाधानाची कमतरता म्हणजे असंतोष ?? आपल्या अपेक्षांची पूर्तता न झाल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे असंतोष ?? ही मूळ स्वाभाविक मानवी भावना आहे की मानवी मनाची ही एक तत्कालीन स्थिती आहे ?? असंतोष म्हणजे केवळ संतोष नसणे तर नक्कीच नाही... संतोष समाधान नसणे असंतोषाला जन्म देईलच असे नाही. नशीबाला दोष देत आहे त्या परिस्थितीत कण्हत कुढत जगत राहण्याची मानसिकता असेल तर असंतोषा ऐवजी दैववाद जन्माला येतो. म्हणूनच असंतोष ही केवळ स्वाभाविक मानवी प्रवृत्ती नसून जाणीवपूर्वक मनात अन्यायाची भावना निर्माण करणे आहे असे वाटते. 

लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध जनमानसात असंतोष पसरविण्याचा एक अस्त्र म्हणून वापर केला. लोकमान्यांचा काळ ब्रिटिशांच्या अन्याय्य राजवटीचा ... त्या वेळी ब्रिटिशां कडून होणाऱ्या अन्याया विरुद्ध बोलणे म्हणजे राजकीय गुन्हाच !! अशा काळात नशिबाला दोष देत 'आलिया भोगासी असावे सादर' अशी प्रवृत्ती जनमानसात बळावत चाललेली .. अशा वेळी देशहितास्तव स्वराज्य आणि स्वातंत्र्य मिळविण्याच्या हेतूने लोकांच्या मनात अन्यायाविरुद्ध असंतोषाची जाणीव निर्माण करण्याचे काम लोकमान्यांनी केले. आणि ह्या जनभावनेच्या क्षोभाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. विदेशी कपड्यांची, वस्तूंची होळी करणे, वृत्तपत्रांतील लिखाणामधून परकीय सत्तेवर प्रहार करणे, घणघणाती भाषणाच्या द्वारे ब्रिटिश राजवटी विरोधात जनमानस तयार करणे असे विविध मार्ग त्यासाठी वापरले. लोकमान्य टिळकांच्या असंतोष पसरविण्याच्या या कामाची गंभीर दखल इंग्लंड मधील पत्रकार चिरोल यांनी सुद्धा घेतली आणि 'दि इंडियन अनरेस्ट' या पुस्तकातून आणि इंग्लंडच्या 'द टाईम्स' वृत्तपत्रामधील लेखातून टिळक हे राजद्रोही आहेत आणि भारतातील लोकांना भडकविण्याचे देशविघातक कृत्य ते करीत आहेत म्हणून टिळक हेच भारतातील असंतोषाचे जनक आहेत अशी टिळकांची बदनामी करणारी दूषणे लावली. या विरुद्ध लोकमान्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन चालवलेल्या खटल्यातील चिरोलची बाजू मांडणारे वकील सर एडवर्ड कार्सन आपल्या प्राथमिक निवेदनात म्हणतात, "ब्रिटिश राजवटी विरोधात असंतोष निर्माण करण्याचे जे जे मार्ग असतील ते सर्व मार्ग वापरणारी व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळक !!" आपला मित्र आपल्या विषयी काय म्हणतो यापेक्षा आपला विरोधक आपल्याविषयी निंदा करतांना काय म्हणतो हे आपले योग्य मुल्यमापन आहे असे आपण मानतो. आणि निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणतो. या पार्श्वभूमीवर कार्सन यांचे हे उद्गार महत्वपूर्ण आहेत. 

अशा या इतिहासातील असंतोषाचे जन्मदाते असणाऱ्या लोकमान्यांचे आज त्यांच्या स्मृती शताब्दीच्या प्रसंगी स्मरण करताना आणि त्या ऐतिहासिक असंतोषाचा वर्तमानात सामाजिक व राजकीय क्षेत्रात आढळणाऱ्या असंतोषा सोबत तुलनात्मक अभ्यास करतांना आजही आपल्याला असे वर्तमानातील असंतोषाचे जनक जागोजागी सापडतील. जातिगत आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकभावना भडकवणारे आणि शासनाला वेठीस धरीत आंदोलन करणारे हे असंतोषाचे जनक बघितले बघितले समाजातून जात काही केल्या जात नाही हेच खरे असे वाटायला लागते. सवर्ण आणि दलित अशा भेदाला हवा देत संघर्ष कायम ठेवण्या करीता वेळोवेळी असंतोष वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. वर्ग समानतेच्या तत्वावर आधारित साम्यवादाने संवैधानिक मार्गाने प्रस्थापित शासनाव्यवस्थे कडून मागासवर्गीय समाजावर होणाऱ्या शोषणाच्या मुद्द्यावर असंतोषाचे बीज पेरत हिंसक नक्षलवादाचे रूप कधी धारण केले कळलेच नाही. हे नक्षलवादी आणि फुटीरतावादी अशा असंतोषाचे बीज पेरत स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सातत्याने करीत असतात. कुठे दूध उत्पादकांच्या दुधाला भाव मिळाला नाही तर  दूध रस्त्यावर फेकून आपला असंतोष व्यक्त करून शासनावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. तर कुठे वीज ग्राहकांच्या वीज बिलाच्या मुद्द्यावरून वापरलेल्या विजेच्या संपूर्ण बिलाच्या माफीची मागणी करीत, त्यासाठी महावितरणच्या कार्यालयां समोर निदर्शने करीत बिलांची होळी केली जाते. इतकेच नव्हे तर स्त्री आणि पुरुष यांच्यामधील वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपणा जीवनासाठी पूरक आहे आणि त्या अनुषंगाने माणूस म्हणून एकमेकां मध्ये सौहार्दपूर्ण आदरयुक्त संबंधांना वाढविण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी स्त्री-पुरुष लिंगभेद, स्त्रीयांचे स्वातंत्र्य यामुद्द्यांवर राजकारण करीत वाद निर्माण केला जातो, असंतोष पसरविला जातो.  या आणि अशा वेळोवेळी जाणीवपूर्वक घडवून आणल्या जाणाऱ्या अनेक घटना ह्या राजकीय खेळी खेळत आणि जनभावनांचे राजकारण करीत जनमानसामध्ये आपल्याच शासन व्यवस्थे विरुद्ध, एखाद्या संस्थेविरुद्ध, व्यवस्थे विरुद्ध पसरवलेला असंतोषच नाही का !!

पण हा असंतोष निर्माण करण्याचे उद्देश काय? वर्तमानातील हा असंतोष नक्की कुणाविरुद्ध निर्माण केला जातोय ? आपलाच, आपल्याच राजवटी विरुद्ध ?? आपल्याच देशबांधवां विरुद्ध ?? आपणच आपल्यासाठी निर्माण केलेल्या व्यवस्थे विरुद्ध ?? याचा सद्सद्विवेक बुद्धीने विचार मात्र केला जात नाही. एककल्ली आणि हेकेखोर पद्धतीने मिळवलेला एकाचा संतोष हा दुसऱ्याच्या असंतोषाचे कारण ठरू शकतो. म्हणूनच आज निर्माण केला जाणारा असंतोष अन्यायाचे निर्मूलन करण्याचे ऐवजी एकमेकांवर अन्याय करण्यासाठी वापरला जातो आहे का ? असाही प्रश्न पडतो. कारण देशाअंतर्गत असंतोष निर्माण केला जातोय केवळ स्वार्थी, तात्पुरत्या मिळणाऱ्या लाभासाठी, वैयक्तिक प्रतिमा तयार करण्यासाठी .. जाती-धर्म, लिंगभेद, वर्णभेद, वर्गद्वेष अशा या ना त्या कारणांनी असंतोष निर्माण करण्याचा आणि राजकारण व समाजकारणात आपल्या विविध दुकानदाऱ्या चालविण्या साठी असंतोषाचे अस्त्र म्हणून वापरण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आज केला जातोय !! आणि आपल्याच थाळीची चाळणी करू पाहणाऱ्या या छिद्रान्वेषी, फुटीर प्रवृत्तींना हाताशी धरून त्यांना आपल्या फायद्यासाठी खेळवण्याचे आपापसात झुंजवण्याचे काम परकीय शक्ती करीत आहेत. 

लोकमान्य अगदी नजीकच्या इतिहासातील असंतोषाचे जनक असले तरी वेगवेगळ्या कारणांसाठी असा असंतोष जनमानसात निर्माण करण्याचे कार्य याआधीही झाले होते. मुघलांच्या जुलुमी राजवटी विरोधात शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा लढा देण्यासाठी रयते मध्ये असंतोष निर्माण केला. त्यापूर्वी सुद्धा ज्ञानेश्वरां सारख्या संतांनी समाजातील अन्याय रूढी परंपरां विरुद्ध मनातील असंतोष व्यक्त केला पण वेगळ्या मार्गाने ! कर्मकांडाचे अवडंबर माजवणाऱ्या आपल्याच मूठभर लोकांनी आपल्यावर अन्याय केला म्हणून ते आक्रमक झाले नाहीत. त्यांनी ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांद्वारे, विविध अभंगांच्या माध्यमातून लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत समाज प्रबोधनाचे काम केले... लोकमान्यांनी सुद्धा गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहून समाजाला मार्गदर्शन केले... 
आम्ही मात्र असंतोष आणि अन्याय विरुद्ध लढा म्हटले की फक्त लोकमान्यांनी केलेली होळी आणि शिवाजी महाराजांचा गनिमी लढा एवढेच लक्षात ठेवले. असंतोष हा केवळ प्रस्थापित राजकीय राजवटीच्या विरोधातच व्यक्त करायचा असतो असे समजून बसलो. आणि हा असंतोष व्यक्त करतांना पूर्वीच्या काळात असणारी आक्रमणकारी साम्राज्यवादी परकीय राजवट आणि आज आपल्या जनतेने निवडून दिलेले आपलेच राज्यकर्ते यातील फरक आपण विसरलो. त्यांनी त्याकाळात वापरलेले असंतोष व्यक्त करण्याचे उपाय आज आम्ही आपल्याच राज्यकर्त्यांना विरुद्ध वापरतो आहोत. विदेशी मालाची होळी आणि आपल्याच सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड आणि जाळपोळ सारखीच आहे का ? शिवाजी महाराजांच्या गनिमी लढ्याची तुलना आजच्या नक्षलवाद्यांच्या उपद्रवाशी करावी का ?

हे आजचे वर्तमान आहे. आणि आपण त्यातच गुंतून पडलो आहोत. यात आपले काही महत्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होत आहे ज्या भविष्यातील असंतोषाची कारणे ठरू शकतील. पर्यावरण .. प्रदूषण .. निसर्गाचा ऱ्हास .. पाणी .. गरीब-श्रीमंत वाढणारी दरी ... ढासळते कौटुंबिक स्वास्थ्य ... अविकसित दुर्गम भाग अशा वर्तमानाच्या वेशीवरील भविष्यातील असंतोषाच्या कारणांची यादी करायची झाली तर बरीच मोठी होईल ... आणि सध्या तर वर्तमानातील कोरोना प्रादुर्भाव, त्यामुळे करण्यात आलेले लॉकडाउन आणि त्यामुळे थांबलेले अर्थचक्र असे सारे घटक असंतोषाचे कारण ठरू शकतील अशी भीती सध्या वेगवेगळ्या चिंतनशील व्यक्तींकडून, विचारवंतांकडून, अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे. कालांतराने कोरोना प्रादुर्भाव ओसरल्यानंतर प्रत्येकाची ढासळलेली आर्थिक परिस्थिती, बेरोजगारी, व्यावसायिक दिवाळखोरी इत्यादी बाबी वर्तमान आणि भविष्याच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत.  जेव्हा या कोरोना प्रभावाने सानथोर, गरीब-श्रीमंत, व्यावसायिक-चाकरमानी असे सारेच प्रभावित झाले आहेत तेव्हा परिस्थितीने आलेल्या हतबलतेतून, अगतिकतेतून किंवा व्यवस्थापन, प्रशासना कडून घेतल्या गेलेल्या काही अपरिहार्य निर्णयाने अनेक मने निराशेच्या गर्तेत सापडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्या मनांत विघ्नसंतोषी लोकांकडून असंतोष पेरणे फार कठीण नाही. मात्र प्रत्येकाने अशा असंतोषाच्या जनकांपासून सावध रहायला हवे. काही वेळा परिस्थितीचा गैरफायदा घेणारे आणि त्यातून आपला स्वार्थ साधणारे लोक असतीलही. त्यांच्या अन्याय वागणुकी विरोधात आवाज उठवायलाच हवा. मात्र काही परिस्थितीजन्य अपरिहार्यतेतून घेतले गेलेले आपल्याला अप्रिय वाटणारे निर्णय समजून घेणे आणि योग्य सकारात्मक प्रतिसाद देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. याच वेळी व्यवस्थापन आणि प्रशासनाने आपले नियम लागू करताना आणि निर्णय घेताना त्यांच्या अंमलबजावणी मुळे जनतेत असंतोष तर पसरणार नाही याचा विचार करणे सुद्धा आवश्यक ठरते.

अशा परिस्थितीत भूतकाळातील असंतोष आणि तो प्रकट करण्यासाठी अमलात आणलेले मार्ग वर्तमानात जसे च्या तसेच न वापरता त्यावेळची परिस्थिती, त्या मागील कारणे याचा सर्वंकष विचार करून त्या असंतोषाचा विचार व्हायला हवा. त्यापासून बोध घेऊन वर्तमानातील समस्यां व परिस्थिती विरोधात असलेला असंतोष विध्वंसक मार्गाने व्यक्त न करता संवैधानिक, विधायक मार्ग निवडणे आवश्यक आहे. तसेच वर्तमानातील असंतोषाचे निराकरण करीत असतानाच भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या असंतोषाच्या मुद्द्यांचा, कारणांचा वेध घेणेही आवश्यक आहे ; जेणे करून भविष्यातील हा असंतोष टाळता येईल … स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयाने झपाटलेल्या, असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य झालेल्या बाळ गंगाधर टिळकांच्या स्मृतीशताब्दीच्या निमित्ताने या बाबींवर विचार होऊन देशातील सामाजिक क्षेत्रात असंतोषाला पूर्णविराम मिळण्याजोगी संतोषजनक परिस्थिती निर्माण व्हावी या सदिच्छेसह ..!!

प्रसाद द. पोफळी
9822569648
दि. 1 ऑगस्ट 2020