पाश्चात्य ग्राहक संकल्पना, भारतीय ग्राहक चळवळीचा उगम, भारतीय ग्राहक चळवळीचे सूत्रधार, राष्ट्रहित जपणारे ग्राहकहित ... या मुद्यांचा उहापोह करणारा लेख …
राष्ट्रहित जपणारे ग्राहकहित
प्रसाद द. पोफळी, नागपूर
______________________________________
"दुकानातील सर्वात दुर्लक्षित वस्तू कुठली असेल तर ती म्हणजे ग्राहक …!!" समाजातील विसंगती नेमकेपणाने टिपून त्यावर आपल्या खुमासदार शैलीत भाष्य करताना पु.ल. देशपांडेंनी हे वाक्य लिहिलंय … हे ज्या काळात पुलंनी लिहिलं गेलं त्या काळात असा अनुभव अनेकदा अनेकांनी घेतलाही असेल. आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. जगात ग्राहकाभिमुखता वाढलेली आहे. 'ग्राहक' ही दुकानातील वस्तू नसून समाजातील सर्वव्यापी असणारा एक घटक आहे ही संकल्पना समाजव्यवस्थेत रुजली आहे. जगासाठी मोठ्या प्रमाणात 'ग्राहक' उपलब्ध असणारी बाजारपेठ म्हणून ज्या देशाकडे बघितलं जातं अशा आपल्या भारतातही परिस्थितीत बऱ्याच प्रमाणात बदल घडला आहे आणि अजूनही बदल घडताहेत.
ग्राहक चळवळीचे जागतिक संदर्भ
जागतिक स्तरावर ग्राहक या संकल्पनेचा आणि ग्राहकांच्या हक्काचा उल्लेख सर्वप्रथम झाला अमेरिकेत. अमेरिकेन काँग्रेसमध्ये १५ मार्च १९६२ मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकारांबद्दल भाषण केले होते. त्यावेळी ग्राहक हक्कांबद्दल भाष्य करणारे ते पहिले नेते ठरले होते. आणि म्हणून १९८३ पासून १५ मार्च ला ‘World Consumer Day’ साजरा करण्यास सुरुवात झाली. कन्झ्युमर म्हणजे वापरकर्ता, उपभोग घेणारा उपभोक्ता. आणि समाजातील या उपभोग घेणाऱ्या घटकाला संरक्षण मिळावे त्याच्या उपभोगाच्या हक्काला बाधा पोहचू नये म्हणून झालेली ही सुरुवात …
नजीकच्या भूतकाळात डोकावून बघितले तर अमेरिकेत उत्पादन करणाऱ्या कंपन्या ग्राहकांच्या हक्कांना किती प्राधान्य देतात हे लक्षात येईल. २०१५ मध्ये कॅलिफोर्नियात गोळीबाराच्या घटनेत १४ जण मृत्युमुखी पडले. या घटनेमधील गुन्हेगाराच्या जप्त केलेल्या ‘आयफोन’ मधून त्यातील माहिती काढून देण्याची एफबीआय या अमेरिकन तपास यंत्रणेची विनंती ॲपलने धुडकावून लावली. आपल्या ग्राहका सोबतच्या बांधिलकीचा, ग्राहकाच्या गोपनियतेचा दाखला देत, नैतिकतेचा पुकारा करीत ‘ग्राहकांशी प्रतारणा करणार नाही’ असा पवित्रा ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी घेतला. ग्राहकांचे हक्क डावलले जातील या कारणापुढे राष्ट्रहिताचे रक्षण करण्यास अमेरिकन न्याय व्यवस्था सुद्धा हतबल ठरली. असाच प्रकार पुन्हा २०१९-२० च्या काळात घडलेल्या एका घटनेत झाला. पाश्चात्य देशात ग्राहकहित राष्ट्रहितापेक्षा वरचढ ठरल्याचे हे उदाहरण आहे. राष्ट्रहित गौण ठरवून केलेले ग्राहक हक्क संरक्षण हे खरोखरीच ग्राहकहित म्हणता येईल का?
भारतीय ग्राहक संकल्पना
या पृथ्वीतलावर असणारी प्रत्येक वस्तू ही फक्त मानवाच्याच उपभोगासाठी आहे असा पाश्चिमात्य संस्कृती मध्ये वाढलेला 'उपभोग'वादी विचार भारतीय संस्कृतीत नाही. या सृष्टीतील प्रत्येक घटक मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे, मानवी जीवनासाठी ते उपकारक आहेत असा भाव भारतीय संस्कृती मध्ये आहे. मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी प्रकृतीचे शोषण नव्हे तर दोहन करायचे आणि ते करीत असताना त्या प्रत्येक उपयोगी घटकाप्रति कृतज्ञतेचा भाव सदैव जागृत ठेवायचा ही आपली संस्कृती. म्हणूनच भारतीय समाज सृष्टीचा उपभोग घेणारा ‘उपभोक्ता’ नाही तर सृष्टीने दिलेले दान कृतज्ञतेने ग्रहण करणारा ‘ग्राहक’ आहे. त्यामुळे प्राचीन भारतीय समाज व्यवस्थेत कन्झ्युमर या संकल्पनेवर विचार करण्याची, त्याबाबत काळजी करण्याची गरज भासली नाही.
स्वातंत्र्योत्तर स्थिती
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतात औद्योगिकीकरणाचे वारे वाहू लागले. समाजात उद्योग उभारणारे भांडवलदार मालक, कारखान्यात काम करणारे कामगार असा वर्गवाद फोफावला. प्रत्येक वर्ग स्वहिताचा विचार करू लागला. त्यातूनच कामगारांचे हित जोपासणाऱ्या कामगार संघटना उभ्या झाल्या. आता जगातील सर्वात मोठे लोकतांत्रिक राष्ट्र होऊ पाहणाऱ्या भारतातील कामगार चळवळ पारतंत्र्याच्या काळातील सत्याग्रह आणि असहकार चळवळीच्या धर्तीवर कामगारांच्या मागण्यांसाठी संप करण्याच्या मार्गाचा अवलंब करू लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या राष्ट्र उभारणीच्या कार्यात असे संप अडथळा ठरू लागले आणि संसाधनांच्या अभावात जगणाऱ्या भारतीय जनतेच्या अडचणी वाढवू लागले.
भारतीय ग्राहक चळवळीचा उगम
अशा काळात ग्राहक या संकल्पनेला नव्या स्वरूपात मांडण्याची आणि वर्ग समन्वय साधण्याची गरज रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक प.पू. श्री गोळवलकर गुरुजींनी ओळखली होती. १९६५ मध्ये योग्य वेतन मिळावे म्हणून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह सर्व कामगार संघटनांचा सहभाग असलेला एक देशव्यापी संप झाला. त्याबाबत प पू श्री गुरुजींनी भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली. संपावर तोडगा सुचविण्यासाठी सरकारकडून स्थापन झालेल्या उद्योजक, मजूर आणि सरकारी अधिकारी यांच्या त्रिपक्षीय समितीबाबत त्यांना माहिती देण्यात आली. त्यावर गुरुजी म्हणाले की शासन, उद्योजक आणि कामगार या तीन घटकां प्रमाणेच या कारखान्यात उत्पादित उत्पादन वापरतो तो सर्वसामान्य माणूस म्हणजे 'ग्राहक' तितकाच महत्वाचा आहे. त्याच्या हितरक्षणाचा जर विचार जर होत नसेल तर या समस्येवर सर्वसमावेशक आणि संतुलित असा राष्ट्रहित साधणारा तोडगा कसा निघणार? यावर सर्व कार्यकर्ते निरुत्तर झाले.
त्यानंतर मजदूर संघाचे संस्थापक मा.दत्तोपंत ठेंगडी यांनी एका बैठकीत कामगार चळवळीतील ‘ग्राहक भाव’ हा विषय मांडला. कारखान्यात काम करणारा कामगार हा केवळ त्या उद्योजकांसाठी किंवा सरकारसाठी काम करीत नसून तो ती सेवा किंवा वस्तू जो वापरणार आहे त्या ग्राहकांसाठी सुद्धा काम करत असतो. एका ठिकाणी उत्पादक, कामगार किंवा सरकारी कर्मचारी या भूमिकेत असणारी व्यक्ती इतर सर्व ठिकाणी ग्राहकच असते. त्यामुळे आपण सर्व ग्राहक आहोत आणि ग्राहकहिताची पर्यायाने समाजहिता व राष्ट्रहिताची जाणीव आपण कायम ठेवली पाहिजे. आपल्या श्रमांच्या मोबदल्यात लाभाच्या न्याय मागण्या करतांना आणि त्यासाठी संप करताना ज्याला अंतिम लाभ मिळावयाचा आहे तो ग्राहक दुर्लक्षित होता कामा नये. त्याची गैरसोय होऊ नये याची काळजी घेऊनच आपण आंदोलन केले पाहिजे. असा त्या प्रबोधनाचा आशय होता. भारतीय ग्राहक चळवळीचे बीज अशा राष्ट्रहिताच्या संस्कारात रुजलेले आहे.
भारतीय ग्राहक चळवळीचे सूत्रधार
श्री गुरुजीं सोबत कामगार कार्यकर्त्यांची भेट आणि मा. दत्तोपंत ठेंगडी यांचे कामगारां समोरचे उद्बोधन या दोन्ही वेळी दत्तोपंतां सोबत निकट संबंध असणारे आणि त्यावेळी नागपूरच्या दै तरुण भारत मध्ये कामगार जगत हा स्तंभ लेखन करणारे पत्रकार राजाभाऊ पोफळी तेथे उपस्थित होते. गुरुजींच्या सखोल चिंतनातून आलेल्या आणि दत्तोपंतांनी कामगारांपुढे मांडलेल्या विचारांनी राजाभाऊ अतिशय प्रभावित झाले. आणि इथेच भारतीय ग्राहक चळवळीचे पहिले बीजारोपण झाले. राजाभाऊ भारतीय ग्राहक चळवळीचे सूत्रधार बनले. त्यांनी आपल्या लिखाणातून आणि भाषणांतून ‘कामगार आणि ग्राहक जागरूकता’ हा विषय मांडायला सुरुवात केली. नागपुरात कार्यकर्त्यांना जमवून ग्राहकांचे संघटन केले. मा. बापुसाहेब महाशब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक प्रबोधनाकरिता मराठी-हिंदी द्विभाषिक साप्ताहिकाचे प्रकाशन सुद्धा सुरू केले. दरम्यानच्या काळात त्याच संघ विचारांच्या प्रेरणेतून श्री बिंदुमाधव जोशी सुद्धा याविषयीचे काम पुण्यात करीत होते. बापूसाहेब महाशब्दे, राजाभाऊ पोफळी व बिंदुमाधव जोशी यांच्या ध्यासातून आणि त्यांच्या सोबतच्या अनेक सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमधून १९७४ मध्ये ‘ग्राहक: एवं राजा’ आणि ‘राष्ट्र देवो भव’ असे ब्रीदवाक्य असणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत या पहिल्या ग्राहक संघटनेची उभारणी झाली.
भारतीय ग्राहक कायदा
ग्राहकांचे संघटन करण्यासोबतच या काळात ‘ग्राहक कल्याण व शासन’ या विषयावर सखोल अभ्यास केला गेला. १९७२ मध्येच नवी दिल्ली येथे भारत सरकारने आयोजित केलेल्या ग्राहक विषयक परिचर्चेत ग्राहकांसाठी वेगळ्या कायद्याची व न्यायव्यवस्थेचे आवश्यकता या विषयावर राजाभाऊंनी आपले विचार मांडले. १९८० मध्ये अॅड्. गोविंदरावजी मुंधडा यांचे मार्गदर्शनात ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रारूप तयार करून महाराष्ट्र विधीमंडळात अॅड. गोविंदराव आठवले, मनोहर जोशी, मा. गो. वैद्य, आणि संसदेत श्री रामभाऊ म्हाळगी व श्री. बनातवाला यांचे सहकार्याने ‘सदस्यांचे खाजगी विधेयक’ या स्वरूपात सादर सादर करण्यात आले. अशा प्रयत्नांमधून भारतीय ग्राहक कायद्याचे प्रारूप तयार झाले आणि २४ डिसेंबर १९८६ यादिवशी ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. आणि हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
ग्राहकहित आणि राष्ट्रहित
भारतीय आणि पाश्चात्य ग्राहक चळवळीचा विचार केला असता असे जाणवते की जागतिक स्तरावरील Consumer Protection ज्या उपभोगवादी अमेरिकन संकल्पनेवर आधारित आहे तो विचार एकांगी आणि राष्ट्रीयतेला बाधा आणणारा आहे. इतकेच नव्हे तर उपभोगावादला प्रोत्साहित करतांना नैसर्गिक साधा संपत्तीचा अनिर्बंध वापर करून पर्यावरणा साठी हानिकारकही ठरू शकतो. भारतीय ग्राहक चळवळ ही ‘उत्पादन वृद्धि, वितरणात समानता व उपभोगावर संयम’ या त्रिसुत्रीवर आधारित आहे.
ग्राहक हिताबद्दल विचार करताना भारतीय ग्राहक चळवळ वर्गवादाला प्रोत्साहन देत नाही. समाजातील प्रशासन, उद्योजक, व्यापारी आदी घटकां विषयी नकारात्मक भाव बाळगत नाही. ग्राहक चळवळ नफेखोरीच्या, भेसळीच्या विरोधात असली तरी वस्तूचे उचित मूल्य घेऊन सचोटीने व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्याच्या विरोधात नाही. स्वतः सहकारी तत्वावर एखादे भांडार उघडणे हा भारतीय ग्राहक चळवळीचा हेतू नसून उचित व्यवहार करण्यासाठी दुकानदारांना प्रोत्साहित करणे हा आहे. ग्राहक हितासाठी होणारी आंदोलने किंवा निदर्शने संवैधानिक मार्गाने शांततापूर्ण पद्धतीने व्हावीत. जाळपोळ, तोडफोड करून राष्ट्रीय संपत्तीला हानी पोहचविणारी आंदोलने भारतीय ग्राहक चळवळीत निषेधार्ह आहेत. शासकीय यंत्रणेसोबत सौहार्दपूर्ण संवाद आणि अभ्यासपूर्ण मतप्रदर्शन करून ग्राहक केंद्रित व्यवस्था निर्माण हे भारतीय ग्राहक चळवळीचे उद्दिष्ट आहे.
अ.भा. ग्राहक पंचायतीचे प्रेरणा गीत - ग्राहक गीत सांगते ....
अपने हित, औरों के हित का मेल मिलाने वाले हम,
हसते हसते राष्ट्रकार्य में शक्ती लगाने वाले हम ;
भारतमाता का सुख गौरव प्राणों से भी प्यारा है,
जीवनशक्ती उसी माता को भेंट चढानेवाले हम.
राष्ट्रीयत्व हाच भारतीय ग्राहक चळवळीचा मुख्य आधार आहे. म्हणूनच ‘ग्राहक एवं राजा’ असे म्हणत असतांना ‘राष्ट्र देवो भव’हा भाव मनात सतत जागृत असायला हवा. भारतीय ग्राहकाने चंगळवादी उपभोगवादी विचारांचे अनुसरण न करता राष्ट्र उभारणीच्या कार्यात पूरक ठरेल असा डोळस ग्राहकविचार आत्मसात करायला हवा !!
प्रसाद द. पोफळी, नागपूर
भ्रमणध्वनी : ९८२२५६९६४८