#प्रतिष्ठापना_आणि_विसर्जन ....
महाराष्ट्र टाइम्सने दि. 23/09/2018 च्या नागपूर आवृत्तीत प्रकाशित केलेला माझा प्रासंगिक लेख ....
____________________________
#प्रतिष्ठापना_आणि_विसर्जन
"गणपती प्रमाणे ह्या महालक्ष्म्या पण चांगले दहा दिवसां साठी का नाही येत ?" चिरंजीवांचा भाबडा प्रश्न ...
नुकत्याच श्री महालक्ष्मी सण आटोपून निरोप घेऊन गेलेल्या … घरी गणपती मांडण्याची परंपरा कित्येक पिढ्यां पासून खुंटलेली… त्यामुळे बालपणा पासून घरी गणपती आणण्याचे त्याला असलेले आकर्षण आणि त्यासाठीचा त्याचा हट्ट न पुरविला गेल्याने आधीच हिरमोड झालेला… अशा पार्श्वभूमीवर दरवर्षी महालक्ष्मी निरोप घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या मनात जे उदासवाणे मळभ दाटून येतं ते निवळण्या करिता आई-वडील म्हणून आम्हा दोघांचीही नेहमीच तारेवरची कसरत होत असते.
एका कवीने महालक्ष्म्या निरोप घेते वेळी वेळी होणारी मनाची अवस्था अगदी नेमक्या शब्दात व्यक्त केली आहे. तो म्हणतो,
गौराईचे वास्तव्य,चैतन्याची झळाळी...
दिस हा शुभंकर,सकाळ सोनसळी....
आली निरोपाची वेळ,जीवा हुरहूर दाटे...
ये ग पुन्हा तू माऊली,माझ्या घरकुला वाटे..!!
महालक्ष्म्यांना निरोप असो किंवा गणेश विसर्जन अशा वेळी लहान मोठ्या साऱ्यांच्याच मनात असे भाव दाटून येतात. याच मनोवस्थेत असतांना चिरंजिवांच्या शंकेचे कसेबसे निरसन केले, त्याला सावरले, त्याच्या विचारांना वेगळे वळण द्यावे म्हणून मित्राकडे पिटाळले… आणि माझ्या मेंदूला आलेला शीण जावा (?) म्हणून मोबाईल हाती घेतला आणि फेसबुक उघडले …
(मोबाईल ताण हलका करून शीण घालवतो का ? हा एक वेगळ्या लेखाचा आणि PhD करावी असा विषय आहे हा भाग निराळा…)
मनाच्या तारा जुळल्या की मनातलं न बोलताच आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील भाव आपोआपच कळतात. आणि जरी त्या व्यक्ती दूर अंतरावर असतील तरीही अतिन्द्रिय शक्तीच्या आधारे ती जाणीव होते असं म्हणतात. असा अनुभवही बऱ्याच जणांना आलेला असतो. आजकाल या मनाच्या तारा जुळो न जुळो पण मोबाईल आणि विशेषतः सोशल नेटवर्किंग साईट्स च्या तारा आपल्या मनाशी इतक्या जुळल्या आहेत की या आंतरजालाच्या (नव्हे मायाजालाच्या) अतिन्द्रिय शक्तीचा प्रत्यय पदोपदी येत असतो.
हे आता आठवण्याचं कारण असं की फेसबुक उघडले आणि समोरच एक पोस्ट दिसली...
सावरकरांचे वाक्य share केलेली ती पोस्ट वाचली .... सावरकर म्हणतात -
"खरं तर तो कुठेच जात नाही … इथेच असतो … प्रतिष्ठापना, विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ …!!
अनादी, अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणाऱ्यांना आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार?
गणेश, महादेव ही तत्त्वं आहेत सृष्टीतली … विसर्जन माणसांचं असतं, आपल्यासारख्या … तत्वं चिरंतन असतात..!!"
- वि. दा. सावरकर
ही पोस्ट वाचली अन् विचारचक्र सुरू झालं …
खरंच !! या चराचराला व्यापणाऱ्या ज्या निर्गुण निराकार तत्वांचं आपण विविध देवी देवतांच्या रुपात पूजन करतो त्या मूळ तत्वांच विसर्जन होतच नसतं ... ही तत्व चिरंतन आहेत …
आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगातील नव्या तरुण पिढीला हे जरा अध्यात्मिक आणि फार बोजड वाटण्याची शक्यता आहे. त्यांच्या साठी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भौतिकशास्त्र म्हणजे physics मधील law of conservation of energy नुसार "Energy can neither be created nor destroyed; rather, it can only be transformed or transferred from one form to another. " उर्जा निर्माण करता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते हा उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम आहे. ही आधीच अस्तित्वात असणारी पण संशोधकांनी/शास्त्रज्ञांनी परत नव्या रूपात सांगितलेली थेअरी .. हे अध्यात्माचेच विज्ञान स्वरूप ...
जसे या विश्वात असणाऱ्या एकूण उर्जेपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्ट ही होऊ शकत नाही फक्त वेगवेगळे रूप बदलू शकते त्याचप्रमाणे अनादी काळापासून या सृष्टीमधील अस्तित्वात असणारी मूलभूत तत्व नव्याने निर्माण करता येत नसली तरी विसर्जित म्हणजेच नष्ट सुद्धा होणार नाहीत. बदलत्या काळानुसार प्रत्येकवेळी वेगवेगळी रूप पालटून ही तत्व आपल्या अस्तित्वाची जाणीव करून असतात.
या सृष्टीतील पार्थिव घटकां पैकी एक म्हणजे माणूस … या माणसाला सृजन आनंद देतं … त्याच्या नवनिर्मितीचा हा अविष्कार असतो आणि तो त्यातच रमतो … केवळ रममाण होतो असंच नाही तर त्याच्या मोहातच पडतो … पण विसर्जन अटळ आहे ... पार्थिव चराचरातील प्रत्येकाचेच …
प्रत्येक सृजन हे या चिरंतन तत्वांचे पार्थिव प्रकटीकरण आहे, काही काळापुरती होणारी त्याची प्रतिष्ठापना आणि अस्तित्व या जीवसृष्टीला उपकारक आहे, आणि कालांतराने या पार्थिव रूपाचे विसर्जन होऊन पुनश्च ही तत्त्व कालानुरूप नव्या रूपात प्रकट होत असतात ....
याची जाणीव आपल्याला असावी म्हणून प्रत्येक वेळी, दरवर्षी ही प्राण-प्रतिष्ठापना आणि विसर्जन...!!
आजकाल आपली मुलं विज्ञान शिकतात पण प्राण-प्रतिष्ठापना आणि विसर्जन यांच्या बद्दलची ही जाणीव त्यांना रुचेल आणि पटेल अशा नव्या स्वरुपात परत परत करून देणे हे आपलंच काम नाही का !!
___________________________________
प्रसाद दत्तात्रेय पोफळी | दि. 18 सप्टेंबर 2018