भावाची_तर_झाली_माती !!
_______________________________
• प्रसाद द. पोफळी
जात असती जाणारे तेथे,
जाती न जे, ते मानत होते ..
जमेल जैसा, असेल तैसा,
भक्ती भाव ते जपून होते !!
दंभ म्हणू की म्हणू सोवळे,
रूढींना जो जबरीने पाळे ..
कसे म्हणू मी त्यास सुधारक
भाव मनातील ज्यास न कळे !!
कोण नव्याने आता जाई,
भाव भक्ती संपावर राही ..
देवभक्त अन् पुरोगामी हा
आव कुठूनसा उसळून येई !!
आनंदाचे झरे वाहती,
उत्साहाला येई भरती ..
जो तो सांगे प्रत्येकाला,
विजय मिळविला देवा वरती !!
बघा जाहले द्वार मोकळे,
कुठे न बंदी नसती ताळे ..
दगडा मध्ये देव शोधीती,
देव तयांना कसा आकळे !!
भाव तेथे देवही वसती,
संत महात्मे सर्व सांगती,
कुठे मिळावा खरा देव तो,
भावाची तर झाली माती !!
..... भावाची तर झाली माती !!
अय्यप्पा स्वामी मंदिरातील प्रवेशबंदी वर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णया नंतर सुरू झालेल्या प्रतिक्रिया आणि चर्चा ऐकून आणि वाचून माझ्या मनातील प्रश्न मांडण्याचा कवितेच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न .... ही कविता वाचून कवितेतील भाव न पटल्याची एक प्रतिक्रिया व्यक्तिगत रित्या आली. म्हणून मग त्यावर जरा विस्ताराने लिहिले ...
तसा मी नास्तिक नाही पण मी स्वतः स्वतःहुन फार देवळात जात नाही. मात्र लग्न झाल्यापासून वर्षातून एकदा लग्नाच्या वाढदिवसाला न चुकता ठराविक देवळात सपत्नीक जाऊन देवदर्शन करायचे हा नियम मी आजवर पाळला आहे. कारण एकच, माझ्या बायकोची त्या देवळातील देवांवर श्रद्धा आहे तिची ती आस्था आहे. आणि तिच्या त्या श्रद्धेचा, आस्थेचा मला मनापासून आदर आहे.
"देव ही एक वस्तू नसून एक संकल्पना आहे. ज्यावेळी ती अस्तित्वात आली त्यावेळेच्या श्रद्धा, आस्था, रूढी आणि परंपरांचा समावेश त्या संकल्पनेत आहे. या सर्वांचे मिळून एकत्रित सगुण स्वरूप म्हणजे ती देवाची मूर्ती आहे. देव सर्वत्र असला तरी सगुण पूजन हा श्रद्धेचाच एक भाग आहे." हे देव आणि परंपरा माणणाऱ्यांचं म्हणणं … खरं आहे ना … मी सुद्धा ते मानतो…. देवालयांच स्थान महात्म्य सुद्धा मानतो…. आणि खरं तर मागे झालेले शनी मंदिर प्रकरण असो वा आताचे शबरीमला, ज्या मंदिरांच्या बाबतीत हा प्रश्न उपस्थित होतो, मंदिराच्या प्रथां बाबत काही लोक आग्रही असतात आणि प्रवेश मिळावा म्हणून काही आंदोलन करतात ते सर्व या स्थानमहात्म्य, श्रद्धा आणि आस्थां मुळेच ...
ह्या श्रद्धा आणि आस्थां मधूनच पूर्वापार चालत आलेल्या काही रूढी आणि परंपरा आहेत. त्या वेळी त्या काळी असणाऱ्या परिस्थिती नुसार त्या रूढी, परंपरा प्रस्थापित झाल्या असाव्यात. त्यावेळी त्या कालसुसंगत सुद्धा असाव्यात. उदाहरणार्थ त्या काळी स्वच्छतेच्या दृष्टीने शौचासाठी गावाबाहेर व्यवस्था असायची. आज घराघरात शौचालय आहे. तसंच मासिक पाळी च्या वेळी स्त्रीला स्वच्छतेच्या दृष्टीने काही मर्यादा होत्या. आज वापरासाठी उपलब्ध 'वापरा आणि फेका' या तत्वावर आधारित विविध सुटसुटीत उपायां मुळे ह्या मर्यादा शिथिल झाल्या आहेत.
(या आणि इतरही अनेक बाबतीत 'वापरा आणि फेका' तत्वावर मानवाने उपयोगात आणलेले उपाय आता पर्यावरणाच्या दृष्टीने भस्मासुर ठरतील की काय अशी परिस्थिती निर्माण होते आहे. पण तो चिंतेचा आणि चर्चेचा वेगळा मुद्दा आहे.)
मी लहान असतांना ची आठवण सांगतो. त्यावेळी स्वयंपाका साठी LPG सिलेंडर च्या वापराची नुकतीच सुरुवात झाली होती. पण आमची आजी चुलीवर स्वयंपाक करायची. आमच्या आजीला सिलेंडर वापरलेलं चालायचं नाही. कारण काय तर सोवळे ओवळे .. ते सिलेंडर बाहेरून कुठून कसं येतं, त्यावर किती घाण असेल म्हणून त्याला स्वयंपाकघरात प्रवेश नको या विचाराने तो विरोध होता. स्वच्छतेच्या दृष्टीने तो चुकीचा नव्हताच. पुढे धूर, प्रदूषण तिला होणारा दमा, खोकला याचा विचार तिच्या मनात रुजवत हळूहळू आमच्या घरी सिलेंडर वापरायला सुरुवात झाली. पण सिलेंडर घरात घेण्यापूर्वी त्याला सचैल स्नान करूनच प्रवेश मिळायचा. सणाच्या दिवशी मात्र स्वयंपाक चुलीवरच व्हावा हा आग्रह असायचाच. आज colin ने चकाचक ठेवलेल्या आपल्या मॉड्युलर किचन मध्ये ते सिलेंडर ठेवताना त्याच्या सोबत येणाऱ्या घाणीचा विचार आपल्या डोक्यातही येत नाही. मग आजीचा दृष्टिकोन डोळस की आपला असा विचार मला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.
पूर्वीच्या परंपरा आज कालसुसंगत नाहीत आणि त्या कालानुरूप बदलायला हव्यात हेही मान्य. पण त्या करताना ज्यांचा त्या परंपरांवर विश्वास आहे, त्यांच्या त्या देवावरील श्रद्धा, आस्थेचा तो एक भाग आहे अशा लोकांच्या श्रद्धा आणि आस्थांना ठेच न लावता आपल्याला काही बदल घडवता येणार नाहीत का ? याचा विचार व्हायला हवा.
देवाची मूर्ती, त्याचे मंदिर हे त्या सोबतच्या संकल्पना, रूढी, परंपरा आणि आस्थां चे एकत्रितपणे मूर्तीच्या माध्यमातून प्रस्थापित झालेले सगुण स्वरूप आहे. मग ज्या संकल्पना, रूढी - परंपरा विषयी आपल्याला आस्था नाही त्या देवाच्या दगडावर आपली श्रद्धा नेमकी कशासाठी असते ?? श्रद्धा नसेल तर मग नेमकं तिथेच जाण्याचा आपला आग्रह का असतो ? ज्यांचा डोळस दृष्टीकोन आहे त्यांची पूजा आणि श्रद्धा स्थाना बाबतीतील भूमिका स्थानमहात्म्या पलीकडचा विचार करण्या इतकी प्रगल्भ सुद्धा असावी अशी अपेक्षा असणं चुकीचं तर नाही ना ? रूढी आणि परंपरा यांच्या बाबतीत विज्ञानाधिष्ठित आणि व्यापक सुधारणावादी असणाऱ्या तुमच्या-माझ्या सारख्या लोकांचा दृष्टिकोन एका देवाच्या दगडी मूर्ति पुरता संकुचित का व्हावा ??
आपल्या मनाला जे पटत नाही त्या ठिकाणी आपण जाणारच नाही. किंवा आपला भक्तीभाव केंद्रित करण्यासाठी जर आवश्यकच असेल तर तसे वेगळे केंद्रच मी निर्माण करीन अशी वेगळी संघर्ष निर्माण न करणारी भूमिका आपण घेतली तर काय हरकत आहे. परंपरा मानणाऱ्या लोकांच्या सद्य परीस्थितीत असणाऱ्या श्रद्धा आणि आस्थांचा अवमान न करता हळूहळू त्यांचे मनपरिवर्तन करून समाजपरिवर्तन घडेल की प्रत्येक ठिकाणी कायदा करून ? याचा सुद्धा विचार व्हावा ...
सध्या या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने समोर आलेल्या याचिकेवर सुनावणी करून आदेश दिलेला आहे. पण या आदेशा मुळे स्थानिक भक्त मंडळी दुखावल्या गेल्याने काही मंडळी त्यावर पुनर्विचार व्हावा म्हणून प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आदेश देतांना मंदिर प्रशासनाला विश्वासात घेण्यात आणि स्थानिक जनतेच्या भावना समजून घेण्यात सुप्रीम कोर्ट कमी पडलं की काय असं कुठे तरी वाटायला लागतं.
बऱ्याचदा आपला हिंदू धर्म बदल सहजतेने स्वीकारतो … तसा तो लवचिकही आहे … विज्ञानाधिष्ठित आहे … या बद्दल मला सार्थ अभिमान वाटतो. मात्र प्रत्येक गोष्टीचे, गुणांचे, विचारांचे आपापले फायदे तोटे असतात ... त्यातून मध्यम मार्ग काढावा आणि सुवर्ण मध्य साधावा .... एवढीच इच्छा !!
_______________________________
प्रसाद द. पोफळी | दि. 2ऑक्टो. 2018
#शबरीमाला #अय्यपा_स्वामी #मंदिरप्रवेश
No comments:
Post a Comment