महन्मंगलतेची वाटचाल ...
- प्रसाद द. पोफळी, नागपूर
_______________________
"सर्व महापुरुषांचे सर्व 'समर्थक' हे त्यांच्या विचारांचे 'अनुयायी' असतीलच याबद्दल आता खात्री देता येत नाही. कारण अशा महान व्यक्तित्वांना देवत्व देऊन त्यांचे प्रतिमापूजन करण्याचीच वृत्ती बहुतांश समर्थकांच्या ठिकाणी प्रत्ययास येते. त्यांचा विचार त्यांची तत्व यांचा डोळसपणे अनुनय करून तो विचार पुढे नेण्याचे शिवधनुष्य उचलून धरणारा अनुयायी आता दुर्मिळ होत चालला आहे. आणि कदाचित हेच सर्व गोंधळाचे कारणही आहे ..."
-------------------------------------------------------------
आज गांधी जयंती ... महात्मा गांधी यांचा जन्म दिवस ... दरवर्षी प्रमाणेच यंदाही गांधी, गोडसे यांच्या समर्थकांच्या परस्पर विरोधी विधाने आणि प्रतिक्रियांना समाज माध्यमांवर म्हणजेच सोशल मीडियावर उत येईल.
महापुरुषांचे सर्व 'समर्थक' हे त्यांच्या विचारांचे 'अनुयायी' असतीलच याबद्दल खात्री नसल्याने केवळ 'समर्थक' असा शब्दप्रयोग केला आहे. कारण अशा महान व्यक्तित्वांना देवत्व देऊन त्यांचे प्रतिमापूजन करण्याचीच वृत्ती बहुतांश समर्थकांच्या ठिकाणी प्रत्ययास येते. त्यांचा विचार त्यांची तत्व यांचा डोळसपणे अनुनय करून तो विचार पुढे नेण्याचे शिवधनुष्य उचलून धरणारा अनुयायी आता दुर्मिळ होत चालला आहे.
सुर-असुर, देव-दानव,
मधली अवस्था म्हणजे मानव ..
सद्गुण जोपासले तर घडतो राम ,
दुर्गुण वाढले तर बनतो रावण !!
देव आणि दानव हे दोन विरुद्ध वृत्तीचे दर्शन आहे. सर्व सद्गुणांचा, सत्प्रवृत्तींचा समुच्चय जिथे असतो तिथे आपल्याला देवत्वाची प्रचिती येते आणि सर्व दुर्गुणांचे, दुष्प्रवृत्तींचे प्रदर्शन झाले की राक्षसी वृत्ती जाणवायला लागते. प्रत्येक माणूस हा या दोन वृत्तीच्या सोबत वाटचाल करणारा … या वाटचालीत जेव्हा तो आपल्यातील दुर्गुणांना दूर सारत जास्तीत जास्त गुण, सत्प्रवृत्तींना आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो देवमाणूस ठरतो आणि याच्या उलट घडले तर तो राक्षस म्हणवल्या जातो. म्हणूनच रावण कितीही मोठा शिवभक्त असला तरी त्याच्यातील दुष्प्रवृत्ती त्याच्या गुणांपेक्षा जास्त प्रबळ होत्या त्यामुळे तो दानव ठरला.
माणूस म्हटला की त्याच्यात गुणदोष असणारच हे गृहीतक मानावे लागते. तसे न करता त्या व्यक्तित्वाच्या गुणांचे गुणगान करतांना त्याच्या विचारपद्धतीत काही दोष किंवा त्रुटी असू शकतात हे आपण साफ अमान्य केलेले असते. आणि मग त्या व्यक्तिमत्त्वातील गुणांसोबतच त्यातील दोषांचे समर्थन करणे सुरू होते. त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीने दुरुपयोग केला जातो. जुन्या प्रथा, परंपरांची त्याचे त्याकाळातील संदर्भ लक्षात घेऊन याबाबत काळाच्या कसोटीवर तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ कसोटी लावून वर्तमानातील प्रासंगीकता, उपयुक्तता तपासणे जसे आवश्यक आहे तसेच होऊन गेलेल्या दर्शनीकांचे तत्वज्ञान आणि युगपुरुषांची वक्तव्ये आणि भूमिका यांच्या बाबतीतही डोळस, समंजस, आणि समतोल भूमिका घेणे आवश्यक आहे. नाहीतर दगडा ला भोळसट पणे दिलेले देवत्व आणि एखाद्या विचार प्रवाहाचे अंधानुकरण दोन्हीही अंधश्रद्धाच ठरणार नाहीत का ?
खरं तर त्या वक्तव्यांना त्यावेळची सामाजिक परिस्थिती, त्यात कालानुरूप बदल करण्याची आवश्यकता या संदर्भात बघायला हवं. आजच्या काळात ते किती प्रासंगिक आहेत समाजात सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीने कितपत संतुलित आहेत या दृष्टीने विचार व्हायला हवा. असे न करता एखाद्या व्यक्तित्वाला जेव्हा आपण देवमाणूस न मानता त्यालाच देव मानतो तेव्हाच नेमकी आपली चूक होते. हे असे वागणे म्हणजे "मातृ देवो भव, पितृ देवो भव' यानुसार माझे आई-वडील मला देवासमान आहेत आणि म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे जे निर्णय घेतले, ते योग्यच आहेत आणि ते कुठे चुकूच शकत नाहीत असे म्हणत त्यांच्या वारसदारांनी पिढ्या न् पिढ्या भाऊबंदकीचा वाद घालत राहणेच नाही काय !
जेव्हा आईवडील मुलाला खांद्यावर बसवून आपले मार्गक्रमण करीत असतात तेव्हा त्या मुलाच्या दृष्टीस पडणारे क्षितिज वडिलांपेक्षा विस्तारित झालेले असते. त्या वाटचालीत येणाऱ्या अडथळ्यांमुळे वडिल कुठे अडखळले, कुठे ठेचकाळले तर त्याचीही जाणीव या मुलाला होत असते. आणि या वाटचालीची नोंद मुलाच्या मेंदूत कुठे ना कुठे होत असते. जेव्हा हाच मुलगा मोठा होतो आणि सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत मार्गक्रमण करू लागतो तेव्हा लहानपणी वडिलांनी दाखवलेल्या मार्गावरून चालतांनाच अनुभवलेल्या त्या अडथळ्यांच्या घटनांवरून बोध घेत मुलाने त्या टाळणे अपेक्षित असते. तरच पुढच्या पिढीची वाटचाल वेगाने उत्कर्ष साधू शकते. असे न करता मागच्या पिढीतील चुकांनाही योग्य ठरविण्याच्या मोहात जर का मुलगा पडला तर मग हे अडथळे वाढत जातात आणि उत्कर्षबिंदू आणखी क्षितिजा पल्याड जायला लागतो !!
गांधीजी असोत, स्वा. सावरकर असोत किंवा आणखी कुठलाही महापुरुष, त्यांच्या जीवनाकडे बघतांना आपण त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची दृष्टी ठेवत नाही हेच कदाचित या होणाऱ्या गदारोळाचे कारण असावे. आपल्याला आदरणीय वाटणाऱ्या व्यक्तिमत्वांच्या जीवनाकडे बघतांना आणि त्यांच्या विचारांचे समर्थन करतांना त्यांना माणूस म्हणून समजून घेण्यात आणि त्यांच्या तत्त्वानुसार मार्गक्रमण करताना त्यात असणारे दोष दूर सारण्यात आपण कुठे कमी पडतोय का याचा विचार झाला तरच हा गदारोळ टाळता येईल. येत्या नवरात्रोत्सवात याचा विचार झाला, दसरा आणि विजयादशमीच्या निमित्ताने हे सीमोल्लंघन घडले, प्रांजळ विचारांचे शुद्ध सोने आपल्याला वाटता आले तर मग महन्मंगलतेच्या दिशेने वाटचाल अधिक सुकर होईल. !!
____________________________________
प्रसाद द. पोफळी, नागपूर | 9822569648
No comments:
Post a Comment